माणगाव | माणगावचे नाट्यगृह मंजूर होऊन तब्बल आठ वर्षे झाली तरी नाट्यगृहाचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल नाट्यप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे ठिकाण मध्यवर्ती असून ते झपाट्याने विकसित होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक जडणघडणीचे केंद्र म्हणून पहिले जाते. या भागातील सांस्कृतिक चळवळीला अधिक वाव मिळावा, यासाठी आठ वर्षांपूर्वी माणगाव येथे नाट्यगृह मंजूर झाले होते.
मात्र निधीअभावी हे नाट्यगृह आठ वर्षानंतरही अपूर्णच आहे. या नाट्यगृहासाठी जो निधी मंजूर झाला होता, त्याला आठ वर्षे लोटली. आता याच साहित्याचे दर आवायाबाहेर गेल्याने आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या निधीत हे नाट्यगृहाचे काम कसे होणार? हा प्रश्नच आहे. या निधीत आताचे दर विचारात घेऊन पुनर्मूल्यांकन करून निधी मंजूर करावा अशी मागणी होत आहे. अपुर्या निधीमुळे नाट्यगृहाच्या बांधकामाला गती मिळत नसल्याची चर्चा नाट्यप्रेमींमध्ये सुरु आहे. सध्या या नाट्यगृहाचे काम ५० टक्के झाले आहे. प्रेक्षक गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
दक्षिण रायगडमधील सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे तसेच येथे नवनवीन व व्यावसायिक नाटक प्रेक्षकांना पाहता यावीत यासाठी या भागातील नाट्यप्रेमींच्या मागणीचा विचार करून माणगाव नगरपंचायत हद्दीत शासकीय विश्रामगृहासमोर नाट्यगृह मंजूर झाले. या नाट्यगृहाचे बांधकाम अपूर्ण असल्याने नाट्यगृहावरच प्रश्नचिन्ह उभारले आहे. नाट्यगृहाच्या बांधकामाला पुरेसा व वेळेत निधी मिळाला नसल्याने या बांधकामाबाबत नागरिकांतून सवाल उपस्थित होत आहे.
या बांधकामाचे पुनर्मूल्यांकन करून वाढीव निधी मंजूर झाल्यास माणगावचे उशिरा का होईना पण नाट्यगृह चांगले उभे राहिल, अशी अशा नागरिकांना वाटत आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये नाट्यगृह बांधकाम करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे संस्कृतीक कार्य विभागाकडून नाट्यगृह मंजूर झाले होते. त्यानंतर आता बराच कालावधी गेल्याने सर्वच बांधकाम साहित्याचे दर कित्येक पटीने वाढले आहेत.
तसेच मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नाट्यगृह बांधकामाला हा निधी अपुरा पडत आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या बांधकामाचा तिढा कायम राहणार आहे. यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मंजूर करून माणगावचे देखणे, सर्व सोयींनीयुक्त प्रशस्त नाट्यगृह उभारू शकतील, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. या नाट्यगृहात प्रेक्षकांची बसण्याची क्षमता वाढविल्यास खर्या अर्थाने हे नाट्यगृह दक्षिण रायगडमध्ये नावारूपाला येईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता कमी असल्याने आयोजकांना दर्जेदार, नावाजलेली नाटके आणणे परवडणारे नाही.
त्यामुळे प्रेक्षकांना आवडीची, गाजलेली व दर्जेदार नाटके बघता येणार नाहीत. सध्या पनवेल, रोहा, महाड येथे नाट्यगृह आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, येथे नाट्यगृह आहेत. माणगावचे नाट्यगृह ५०० बैठक आसन क्षमतेचे असल्याने तिकिटाचा दर आयोजकांना पर्यायानी वाढवावा लागणार असून हा खर्च उभा करण्यासाठी रसिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता वाढवून ७०० किंवा १००० केल्यास या नाट्यगृहात लहान-मोठे कार्यक्रम व दर्जेदार नाटक ठेवणे सोयीस्कर होईल.