पेण | कार्यक्षेत्राबाहेर बेकायदा सावकारी करुन, दामदुपटीने लोकांकडून पैसे उकळत असल्याप्रकरणी पेण येथील दोन सावकारांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सहाय्यक निबंधक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. पेण तालुक्यातील चिंचपाडा येथील सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्याकडे २०२२-२३ पासून पेण परिसरात सावकारी व्यवसायासाठी निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक रायगड यांचा परवाना आहे.
मात्र हे दोघेही अटी शर्तींचा भंग करुन कार्यक्षेत्राबाहेरदेखील पैसे व्याजाने देत असल्याची तक्रार रायगड पोलिसांकडे आली होती. पेण येथील दोन तरुणांनीही पाटील यांच्याकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. मात्र पैसेवसुली करताना, आर्थिक अडचणीत असलेल्यांकडून अधिकचे पैसे उकळून त्यांच्याकडून आर्थिक लूट केली जात आहे. त्यांची पिळवणूक केली जात आहे, अशी लेखी तक्रार या दोघांनी पोलिसांकडे केली होती.
१९ जुलै रोजी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व सहाय्यक निबंधक संस्था पेण यांनी कारवाई केली. या कारवाईत पाटील यांचे घर, हॉटेल व कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये विविध बँकांचे रकमेचे तसेच कोरे चेक, विविध मालमत्तांचे करारनामे, वचन चिठ्ठ्या, स्टॅम्प पेपर, साटेकरार, पासबुक, मालमत्तेचे खरेदीखत, गाव नकाशा, सावकारी पावती बुक, सावकारी प्रॉमिसरी नोटबुक, कर्जाची खतावणी बुके असा दस्तऐवज या पथकाला मिळून आला होता.
तसेच सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांनी २०२२-२३ पासून सावकारी व्यवसायासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तीचा भंग करून कार्यक्षेत्राच्या बाहेर सावकारी व्यवहार व व्यवसाय करताना आढळून आले. यानंतर या दोघांविरोधात पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.