महाड | महाड-मोरेवाडी एस.टी. फलाटासमोरुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत महाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.
हनुमान वाडी कावळे तर्फे विन्हेर येथे राहणार्या फिर्यादी महिलेची १७ वर्षांची मुलगी आणि तिची १६ वर्षे वय असलेली मैत्रीण १९ जुलै रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास महाड एस.टी. स्टँड येथील मोरेवाडी फलाटासमोरून बेपत्ता झाल्या आहेत. अल्पवयीन असल्यामुळे अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दोन लहान मुली एकाचवेळी गायब झाल्यामुळे महाड परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत महाड पोलीस ठाण्यात बीएनएस अॅक्ट, कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार लतिका खाडे या करीत आहेत.