सुनील तटकरेंना छावा संघटनेची धमकी , महाराष्ट्रात भेटतील तेथे मारण्याची दर्पोक्ती

राष्ट्रवादी-छावा संघटनेतील वाद चिघळण्याची शक्यता

By Raigad Times    22-Jul-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | सुनील तटकरे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी दिसतील तेथेच त्यांना मारहाण करु, अशी धमकी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली असून सूरज चव्हाण यांचे हातपाय मोडण्याची दर्पो क्तीही करण्यात आली आहे. काय गुन्हे होतील ते होऊद्या, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि छावा संघटनेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिले. यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करतानाच, तटकरेंच्या टेबलवर पत्तेदेखील फेकण्यात आले.
 
यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना मारहाण केली. तर जे कार्यकर्ते आले होते, त्यांनी असंवैधानिक भाषेचा वापर केला आहे. तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली; पण त्यांनी तटकरेसाहेबांच्या अंगावर पत्ते फेकल्याचे सूरज चव्हाण म्हणाले. या घटनेनंतर सुनील तटकरे यांनीही या मारहाणीबाबत नापसंती व्यक्त केली.
 
अशाप्रकारे हाणामारी करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. पक्षाचे नेते अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत, त्यांच्या पदाचा राजीनामादेखील घेतला होता. चव्हाण यांनीही आपल्या कृत्याबाबात माफी मागितली. यानंतर प्रकरण शांत होत असतानाच, छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते, खासदार सुनील तटकरे यांना महाराष्ट्रात भेटतील तेथे मारहाण करण्याची धमकी छावाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
 
चव्हाण यांनादेखील हातपाय मोडण्याची भाषा या कार्यकर्त्यांनी केली आहे. तुम्ही कायदा मोडणार असाल तर आम्हीदेखील गुन्हे अंगावर घेण्यासाठी तयार असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सत्ता आहे म्हणून कायदा हातात घेऊ शकता, तर आम्ही पण तो हातात घेतला असता. पोलिसांनी अडवले म्हणून... अन्यथा सोडले नसते, अशी धमकी छावाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. या धमकीनंतर हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
सूरज चव्हाण या मारहाणीत असतील तर ते चुकीचेच आहे. मी याचे कधीही समर्थन करणार नाही. योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मी आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणार नाही. छावा पदाधिकार्‍याला मारहाण झाली ही चूक घडली. मी त्याबाबत नाराजी व्यक्त करतो. - सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँगे्रस, प्रदेशाध्यक्ष