खोपोली | खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत होणार असून ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील, असा टोलाही गोगावलेंनी लगावला आहे.
शिवसेना शिंदे गटाचा खालापूर आणि खोपोली शहराचा मेळावा खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात रविवारी, २० जुलै रोजी पार पडला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे, माजी नगरसेवक दिलीप जाधव, उद्योजक केतन शेंडे, संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, खा. श्रीरंग बारणे, कर्जतचे आ. महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. कर्जत खालापूरात सामना काटेरी टक्करचा आहे, कोणाशी आहे याचा नामोल्लेख करणार नाही मात्र पुढील निवडणुकीत त्यांना तोंड काढू द्यायचे नाही, असा इशारा मंत्री गोगावले यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात भाजपनंतर सर्वाधिक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसैनिक हे आमची कवचकुंडले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते जपणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कुलदिपक शेंडे, दिलीप जाधव यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील, असा टोलाही गोगावलेंनी लगावला आहे. पालकमंत्रीपदाची चर्चा बरीच झाली जिल्ह्यातील ८० टक्के जनतेचे म्हणणे आहे की, भरत गोगावले हे पालकमंत्री व्हावेत.
तुमची इच्छा पूर्ण होईल आणि मीच पालकमंत्री होईन, असा दावाही पुन्हा एकदा भरत गोगावले यांनी केला आहे. कुलदीपक शेंडे हा प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. विरोधक त्यांच्यावर चुकीची टीकाटिप्पणी करत आहेत. माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांचे खोपोलीसाठीचे मोठे योगदान आहे. त्यांचाच समाजसेवेचा वारसा कुलदीपक शेंडे पुढे नेत आहेत. शेंडेच्या पक्षप्रवेशामुळे आपले संघटन आणखी मजबूत होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा, असे अवाहन आ. महेंद्र थोरवेयांनी केले आहे. मेळाव्याप्रसंगी जयेश तावडे, मनोज मिसाळ, दिलीप मणेर, भालचंद्र भोसले, रोहित विचारे, प्रमोद शिर्के, डॉ. सुनील पाटील, जैगुणिया शेख, तानाजी मोगारे आदींना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्याला संपर्कप्रमुख विजू पाटील, भाई शिंदे, डॉ. सुनील पाटील, युवा जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे, मनोहर थोरवे, माजी नगरसेवक अॅड. संकेत भासे, भाई गायकर, उल्हास भुर्के, शशीकांत देशमुख, विनोद साबळे, पंकज पाटील, नीलम चोरघे, सुप्रिया साळूंखे, शिवराम बदे, संदेश पाटील, संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी पक्षात प्रवेश केला आहे. खोपोली शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आ.थोरवेंनी दिला आहे. त्याची परतफेड करण्यासाठी सर्वजण मिळून खोपोली नगरपालिकेवर भगवा फडकवणारच. - कुलदिपक शेंडे