कर्जत | माथेरान पर्यटन स्थळी येणारे पर्यटक विविध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटनासाठी जात असतात. त्यांच्याकडे असलेले खाऊचे रॅपर आणि प्लास्टिक बॉटल तसेच पावसाळा असल्याने वापरले जाणारे रेनकोट हे जंगल भागात कुठेही फेकले जात आहेत. दरम्यान, या प्लास्टिक कचर्याकडे माथेरान नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने जंगल भागात असे प्लास्टिक ही जंगलाचा र्हास करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.
त्यामुळे नगरपरिषदेने ‘कचराकुंडीत कचरा टाकण्यात यावा’ असे आवाहन करणारे फलक शहरात आणि जंगल भागात लावावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमी यांच्याकडून केली जात आहे. माथेरान पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेले प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी जाणार्या पर्यटकांना पायी किंवा घोड्यावरुन प्रवास करावा लागतो. सर्व प्रेक्षणीय स्थळे ही शहराच्या बाजारपेठ भागापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत.
त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी जाण्यास निघताना सोबत खाऊ तसेच शीतपेय आणि पाण्याच्या बॉटल घेऊन निघतात. मात्र ते प्लास्टिक माथेरानचे जंगल विद्रूप करण्यास कारणीभूत ठरत आहेत. शहरातील जंगल भागात सध्या प्लास्टिक रेनकोट यांचा खच दिसून येत आहे. शहराचे प्लास्टिकीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. पावसात भिजण्यासाठी आलेले पर्यटक हे माथेरानमध्ये आल्यावर प्लास्टिकपासून बनवलेले ‘वापरा आणि फेकून द्या’ या तत्वावरील रेनकोट विकत घेतात. पन्नास शंभर रुपयांची किंमत असलेले ते रेनकोट पर्यटक दोन-तीन दिवसांची सहल झाल्यावर रस्त्याच्या कडेला फेकून देतात.
परिणामी शहराचे विद्रुपीकरण होत आहे. पाईंटच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दस्तुरी येथील वाहनतळ, रेल्वे स्टेशन अशा सर्व ठिकाणी हे प्लास्टिक रेनकोट अस्ताव्यस्त पडलेले आढळून येत आहेत. त्याचवेळी जंगल भागात फिरत असलेले पर्यटक हे सोबत घेऊन जाणार्या पाण्याच्या बॉटल आणि खाऊचे रॅपर हे त्यांचा वापर झाल्यावर जागा मिळेल तेथे टाकून देत आहेत. जंगल भागात सध्या प्लास्टिक बॉटल आणि प्लास्टिकचा कचरा निदर्शनास येत आहे. शहरात प्लास्टिक बंदी आहे.
त्याचवेळी एकल प्लास्टिकंची विक्री होऊ नये असे नगरपरिषदेचे निर्देश आहेत. मात्र पर्यटकांकडून वापरण्यात येत असलेले प्लास्टिक आणि प्लास्टिक रॅपर तसेच पाण्याच्या बाटल्या यांच्यावर शासन निर्बंध आणणार आहे काय? असा सवाल विचारला जात आहे. नगरपरिषदेने प्लास्टिक बंदी केली आहे; पण जंगल भागात प्लास्टिक जंगलात फेकून देऊ नये असे कोणतेही फलक लावलेले दिसून येत नाहीत.
त्याचवेळी कचराकुंड्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी फलक लावण्याची गरज असताना जंगल भागात असे फलक नाहीत. त्यामुळे पर्यटक मिळेल त्या ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकून जंगलाचा र्हास करू पाहत आहेत. त्यासाठी नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे जंगल भागात बसवावेत आणि त्यातून कचरा जंगलात टाकणार्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.