पाली-खोपोली महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण; सुधागडातील नागरिकांचा संताप

By Raigad Times    21-Jul-2025
Total Views |
 pali
 
सुधागड-पाली | पाली खोपोली राज्यमहामार्गवरील धोकादायक व जीवघेण्या खड्ड्यात नागरिकांनी शनिवारी, १९ जुलै रोजी वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. तसेच हातात विविध माहिती लिहिलेले फलक घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले व असंतोष दर्शविला.
 
पाली सुधागड संघर्ष संस्था व नागरिकांनी पाली शहरातील व पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे यासंदर्भात अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे. मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यामुळे पालीतील रस्ते व वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास या सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाईल, असे याबाबत संबंधित प्रशासनाला नागरिक व पाली-सुधागड संघर्ष संस्था यांच्यावतीने निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पाली नगरपंचायतीने लागलीच पालीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
 
तसेच मोठे खड्डे सिमेंट काँक्रिटद्वारे भरले. मात्र एमएसआरडीसीने पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी येथे आंदोलन केले. यानेसुद्धा फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले.
 
यासंदर्भात माहिती घेण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. नागरिकांनीही त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. आंदोलन करताना पाली सुधागड संघर्ष संस्थेचे सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.