पेण | पीओपी मूर्तीमूळे प्रदूषण किती होते? याचा शोध कोणीही घेऊ शकले नाही. अजूनही विरोधक आमच्या हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांच्या विरोधात वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. मात्र ह्या विरोधकांना आम्ही पुरुन उरु, असा इशारा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी शिथिल केल्याबद्दल हमरापूर विभाग गणेश उत्कर्ष मंडळातर्फे पेण तांबडशेत येथे शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पीओपीमुळे पर्यावरण नावाची भीती दाखविणारे संकट दूर करणे हे आमचे कर्तव्यच होते. पीओपी नावाखाली पर्यावरण दूषित होतेय, असे सांगण्यासाठी काही मंडळींचे पोटशूल उठले होते. त्यांना उलथवून टाकण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात लढा दिला आणि आम्ही पीओपी गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, हे पटवून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य मार्गदर्शन केले.
त्यामुळेच पीओपी नावाचे संकट पूर्णपणे बाजूला करू शकलो. याचा आम्हाला आनंद आहे, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, नीलिमा पाटील, चित्रा पाटील, वैकुंठ पाटील, शर्मिला पाटील, प्रीतम पाटील, स्मिता पाटील आदीसंह मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी, अभय म्हात्रे, कुणाल पाटील, नितीन मोकल, हितेश जाधव, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
लाखो गणेशमूर्ती कारखानदारांचा व्यवसाय ज्यावर आधारित होता त्या पीओपीवरचे संकट दूर केल्याबद्दल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा जाहीर सत्कार करणे हे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार, असे खासदार धैर्यशील पाटील म्हणाले.
लाखो कामगारांचा आयुष्यभराचा रोजगार वाचवला, आणि पीओपीचा अडथळा दूर केल्याबद्दल आशिष शेलार यांना आ. प्रशांत ठाकूर आणि आ. रवींद्र पाटील यांनी धन्यवाद दिले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महोत्सव आहे. हजारो हातांना काम देणारा महोत्सव आहे. सरकारमुळे हे संकट टळले आहे, असे वैकुंठ पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी तर आभार मूर्तिकार कुणाल पाटील यांनी मानले.