पोलादपूर येथे आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सातत्य कायम , प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दरड हटविण्यात यश

By Raigad Times    21-Jul-2025
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून, सुरुवातीपासूनच पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
सुरेंद्र इन्फ्रास्ट्रचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे संपूर्ण रोडचे काम सोपविण्यात आले असून, सततच्या पावसामुळे कामकाज मंद गतीने सुरू आहे. मात्र, प्रशासन आणि कंपनीचे अधिकारी वेळेवर घटनास्थळी दाखल होत असल्यामुळे मोठ्या दुर्घटना टळल्या आहेत. तहसीलदार कपिल घोरपडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे हे घाट परिसरात सतत दौरे करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
 
दरड कोसळल्यानंतर तत्काळ प्रतिसाद देण्यात येत असून, कंपनीकडून देखील तात्काळ उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दि. १९ रोजी दुपारी चिरेखिंड बावली परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, कंपनीचे अभियंते आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवत तातडीने काम सुरू करण्यात आले असून, रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.