खालापूर | इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला २ वर्षे पूण , श्रध्दांजली कार्यक्रमाला शासकीय अधिकार्‍यांची दांडी

By Raigad Times    21-Jul-2025
Total Views |
 KHOPOLI
 
खोपोली | इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने अनेक माणसे ढिगार्‍याखाली गाडली गेली. डोळ्यादेखत आपली आई, मुलगा, वडील हे दरडखाली गाडले गेले होते. अशा काळीज पिळवटून टाकणार्‍या घटनेला शनिवारी, १९ जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. या घटनेत मृत पावलेल्या दरडग्रस्तांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला खालापूर तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह शासकीय अधिकार्‍यांनी दांडी मारली.
 
तर राजकीय पुढाकार्‍यांनी पाठ फिरवल्याने दरडग्रस्तांनी संताप व्यक्त केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा भेट घेवून नोकरी आणि मदतीचे एशासन दिले होते, तेही हवेत विरून गेल्याचा संताप दरडग्रस्तांनी व्यक्त केला. तहसीलदार आयुब तांबोळी हेच आमचे मायबाप होते, असे सांगत त्यांना अश्रू अनावरण झाले होते. दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठीचा ओघ फक्त फोटो सेशनसाठी होता की काय? असा सवाल त्यांनी केला आहे. इर्शाळवाडीचा डोंगर १९ जुलै २०२३ रोजीच्या रात्री कोसळून भूस्खलन झाल्याने ८४ जणांना प्राण गमवावा लागला आहे.
 
घरे, जनावरे सर्व मातीखाली गाडली गेली. या थरकाप उडविणार्‍या दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. दुर्घटना घडल्यानंतर वर्षभर तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी पालकत्व स्वीकारून पक्की घरे उभारण्यासाठी काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकवेळा भेट घेऊन कुटुंबांना धीर देत रोजगार उपलब्ध करण्याचे ओशासन दिले होते. इर्शाळवाडी दरडग्रस्त गावात घरं बांधली, पाणी, रस्ता, वीज दिली; मात्र रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
 
त्यामध्ये विजेचे बिल भरताना नाकीनऊ आले आहेत, असे सांगताना दरडग्रस्तांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. दुर्घटनेतील मृतांना दुसर्‍या वर्षी श्रंध्दाजली कार्यक्रमासाठीचे निमंत्रण शासकीय अधिकार्‍यांना देण्यात आले होते. मात्र त्यांनी दांडी मारली. खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, अशोक जगताप, पोलीस दिनेश भोईर, देवेंद्र शिंनगारे, बबन घुले, शरद हिवाळे, अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर तसेच नेताजी पालकर, मंडळ चौकचे संघटक यशवंत सकपाळ, रंजना साखरे, अशोक मोरे, बन्सी घेवडे, अनंता पवार, फिरोझ शेख, हर्षल हनुमंते, आनंद गायकवाड, महाराष्ट्र दुर्ग पर्यटन संस्था अध्यक्ष रूपेश तरल, प्रवीण पाटील, श्रेयस सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर, स्वप्निल सोनटक्के तसेच ग्रामस्थ अंकुश वाघ, गणपत पारधी, सुनील पारधी, भगवान भवर, सचिन पारधी, मंगळू पारधी, महादेव सुतक, कमलू पारधी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी नेताजी पालकर मंडळ चौकच्यावतीने रामा पारधी, अशोक भुतबरा, वामन भुतबरा, गणेश भवर, अंजनी भवर, नरेश पारधी, किसन वाघ, पर्वत पारधी या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनीही मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना धीर दिला आहे.