उरण | जेएनपीए बंदरातून देशात बेकायदेशीर सिगारेटचा मारा करणार्यांच्या मुसक्या महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आहेत. तब्बल १३.१८ कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा डीआरआयने जप्त केला असून, एकाला अटक केली आहे. भारतात विक्रीस बंदी असलेली ही सिगारेट समुद्रमार्गे चोरट्या पद्धतीने देशात आणली जात होती.
डीआरआयच्या मुंबई युनिटला मिळालेल्या खाजगी माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. न्हावा-शेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमध्ये कोटेड कॅल्शियम कार्बोनेट असे खोटे भासवून चक्क १०१४ कार्टून परदेशी सिगारेट देशात घुसविण्याचा डाव होता.
पण डीआरआयच्या अधिकार्यांनी तो हाणून पाडत, कंटेनरमधून १ कोटी १ लाख ४० हजार सिगारेट जप्त केल्या. यावर कुठलाही वैधानिक इशारा नसल्याने या सिगारेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कस्टम कायदा १९६२ आणि सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेल्या तस्कराला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, याप्रकरणाचा तपास सुरू आहे.