महाड एमआयडीसीतील प्रसोल कंपनीला आग; कंपनीचे मोठे नुकसान

By Raigad Times    21-Jul-2025
Total Views |
 mahad
 
महाड | औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रातील प्रसोल कंपनीमध्ये शनिवारी (१९ जुलै) सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत केलेल्या कारवाईमुळे आग अर्ध्या ते पाऊण तासात नियंत्रणात आली.
 
त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी दहाच्या सुमारास कंपनीच्या परिसरातून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर तातडीने प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. फॉस्फरस पेंट सल्फाईड हे ज्वलनशील रसायन असलेल्या भागात ही आग लागली होती. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ एमआयडीसी आणि महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले.
 
फॉस्फरस असल्याने पाण्याने ही आग विझविणे शक्य नव्हते. ही आग रासायनिक स्वरूपाची असल्याने त्यावर पाण्याचा वापर करणे शक्य नव्हते. यावेळी महाड उत्पादक संघटनेने पुरव फोम आणि वाळूच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "सकाळी दहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच सर्व यंत्रणांनी वेगाने प्रतिसाद दिला.
 
एकत्रित प्रयत्नांमुळे आग लवकर आटोक्यात आणणे शक्य झाले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही, मात्र, कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. आगीचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू असून कंपनी व्यवस्थापनाकडून यासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.