अलिबाग | अखेर अलिबाग येथील आरसीएफ कुरुळ कॉलनीमध्ये बाहेरील व्यक्तींना पुन्हा प्रवेश सुरू करण्यात आला आहे. चार दिवसांत कुरुळ येथील आरसीफ कर्मचारी वसाहतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रवेश सुरु करावा, असे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कंपनीला बजावले होते. यानंतर तीन दिवसांत कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. येथे चालायला किंवा नियमीत ये-जा करणार्या व्यक्तींना ओळखपत्र घेणे बंधकारक असणार आहे.
आरसीएफ कुरुळ येथील वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश कंपनी प्रशासनाने बंद केले होते. खेळायला येणार्या मुलांना, चालायला येणार्या जेष्ठ नागरीकांना बंदी केली. अशाप्रकारे अचानक बंदी आणल्याने नागरीकांकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, वेश्वीचे सरपंच गणेश गावडे यांनी वसाहतीमधील स्थानिकांसाठी प्रवेश पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी केली होती.
शुक्रवारी रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्याकडे हे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी चार दिवसांत हा रस्ता पुन्हा खुला करण्यात यावा, असे कंपनी प्रशासनाला बजावले होते. यानंतर कंपनीने सोमवारी, ३० जून रोजी, एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात त्यांनी सकाळी सहा ते आठ व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत बाहेरील नागरिकांना वसाहतीमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे म्हटले आहे. यासाठी कंपनीकडून ओळखपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.