कंत्राटी वीज कर्मचारी महेंद्र पाटीलचा शॉक लागून मृत्यू , घटनेची चौकशी करा; ग्रामस्थांची मागणी

By Raigad Times    19-Jul-2025
Total Views |
 uran
 
उरण | तालुक्यात पुन्हा एकदा एका कंत्राटी वीज कामगाराच्या मृत्यूने खळबळ उडवली आहे. चिरनेर येथील महेंद्र (मयूर) रामचंद्र पाटील यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रानसई येथे बुधवारी (दि.१६) ते वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि जागच्या जागी शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र पाटील हे गेली ३० वर्षे महावितरणसाठी कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते.
 
रात्री-अपरात्री, पाऊस-वादळ याची पर्वा न करता लोकांच्या घरी वीज पोहोचावी म्हणून जीव तोडून धावणारा हा माणूस अखेर अशाच वीजेच्या धक्क्याने काळाच्या पडद्याआड गेला. दुर्दैव याचे की ३० वर्षे सेवा करूनही महेंद्र पाटील हे शेवटपर्यंत कंत्राटीच राहिले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, महावितरणचे अधिकारी आणि शासकीय कर्मचारी गायब होते.
 
घटनेच्या वेळी वीज खांबावर काम करत असताना विद्युत पुरवठा सुरू झाला, ही केवळ चूक नाही. ही ठरवून केलेली बेपर्वाई आहे. घटनास्थळी सरकारी अधिकारी उपस्थित असतानाही कंत्राटी कामगाराला वीज खांबावर चढवणे आणि त्याच्या जीवाची तमा न बाळगता लाईन चालू करणं हे थेट ‘खूनसदृश्य’ कृत्य आहे. या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी झालीच पाहिजे. कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा बागुलबुवा उभा करणार्‍या महावितरण व्यवस्थेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 
महेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील असा परिवार आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि महावितरणकडून न्याय मिळावा, ही आमची ठाम मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, तर उरण तालुक्यात कंत्राटी कामगारांबरोबर एकवटून जोरदार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक जनतेतून दिला जात आहे.