पेण | गावाकडे जाणारा रस्ता व अन्य मागण्यांसाठी दुरशेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, शाळेतील विद्यार्थी सहभागी झाली होती. ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरून जलआंदोलन केले. पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन येत्या २२ तारखेला बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, असे सांगितले.
या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, सूरज भोईर, नितेश डंगर, वैशाली पाटील, प्रसाद भोईर, संदीप ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ महिला, विद्यार्थी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुरशेत गावाच्या वरील बाजूस असलेल्या अनेक दगड खाणींच्या दररोज चालणार्या ३०० ते ३५० ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता, गौण खनिज प्लांटमुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका, भरण्यात येत असणारी तुरळक रॉयल्टी आदी महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात मागील १७ जून रोजी याच ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते.
त्यावेळी जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने अखेर आज या ग्रामस्थांना आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन करण्यास भाग पडले. सदर आंदोलनकर्त्यांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उद्या मारल्या. त्यानंतर बर्याच वेळाने पेण चे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत.
त्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच २२ जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. सदर आंदोलना प्रसंगी प्रशासनाच्यावतीने विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणेसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. पेण पालिकेचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापनातील बोट तैनात ठेवण्यात आली होती.