उरण | द्रोणागिरी मंदिर परिसर पवित्रतेचा आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. परंतु काही विघातक, बेशरम आणि नशेखोर प्रवृत्तींच्या लोकांनी हा पवित्र परिसर गांजाच्या धुरात बुडवण्याचा धाडस केले आहे. हे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या सभामंडपात आणि पाण्याच्या टाकीच्या परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थ म्हणजेच गांजाचे सेवन करत असल्याचे उघडपणे निदर्शनास आले आहे.
ही कृती फक्त कायद्याच्याविरोधात नाही, तर द्रोणागिरीच्या पवित्रत्वावर झालेला थेट घाव आहे. या संपूर्ण प्रकाराकडे द्रोणागिरी मंदिर कमिटी आणि करंजा ग्रामस्थ मंडळाने अत्यंत गंभीरतेने दखल घेतली असून, आता थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कोणीही व्यक्ती मंदिर परिसरात धूम्रपान अथवा गांजाचे सेवन करताना आढळल्यास त्याच्यावर ठोस पोलीस कारवाई केली जाईल आणि कोणतीही गय केली जाणार नाही. मंदिर हे भक्तांच्या श्रद्धेचं स्थान आहे. ते नशेखोरांच्या विकृतीचं ठिकाण बनवू पाहणार्यांना ग्रामस्थांनी आता थेट ‘हातात’ घ्यायची तयारी सुरू केली आहे. सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि मंदिर परिसराची शिस्त व पवित्रता राखण्यास पुढाकार घ्यावा; अन्यथा जशास तसे उत्तर दिलें जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.