शेतकर्‍यांवर इको सेन्सेटीव्ह झोन लादू नका! ...अन्यथा रस्त्यावर उतरणार, रोहा शेकापचा इशारा

तहसीलदार, प्रांताधिकारी, वन विभागाला निवेदन

By Raigad Times    18-Jul-2025
Total Views |
roha
 
रोहा | रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र शासनाच्या मसुद्यामध्ये आहे.
 
त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावांचा समावेश आहे. यावर हरकती घेत शेतकरी, ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी शेकापने केली आहे. याबाबत रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी आणि उपविभागीय वन विभाग अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, गणेश मढवी, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, मारुती खांडेकर, गोपीनाथ गंभे, खेळू ढमाल पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष दिवकर, विनायक धामणे, तुकाराम खांडेकर, प्रफुल घावटे, विचारे, राजू तेलंगे, दीपक दाईलकर यांच्यासह तालुक्यातील शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, रोहे तालुक्यांतील एकूण ११९ गावांना इको सेन्सेटीव्ह झोनची अधिसूचना लागू करण्यासाठी जारी केली आहे.
 
याला हरकत घेत, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शेलेंद्रकुमार जाधव यांना देण्यात आले. रोहा तालुका हा औद्योगिक एम.आय.डी.सी. असलेला तालुका आहे. तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालीकेच्या जवळ असलेला तालुका आहे. तसेच रोहा तालुक्याचे लगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरातः रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदल ड्रिलींग, विभोर स्टील हे कारखाने आहेत तर धाटाव एम.आय.डी. सी. चे क्षेत्रामध्ये ५० केमिकल कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भातउत्पादक शेतकर्‍यांचा तालुका आहे.
 
रायगड जिल्ह्यातील भाताचा कोठार असणारा तालुका आहे. रोह्यात उत्पादीत होणारे पोहे देशभरात जातात. शेतीपूरक व्यवसाय म्हणून विटभट्टी, कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात असे म्हटले आहे. त्यामुळे ११९ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकर्‍यांवर मोठा अन्याय होणार आहे. स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग शेतकर्‍यांना करता येणार नाहीत. शेतघरे, गुरांचे गोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटीर उद्योग करता येणार नाहीत.
 
त्यामुळे रोहे तालुक्यांतील ११९ गावांतील शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याचा गांभीर्याने विचार करुन, केंद्र शासनाने व राज्य सरकारने पर्यावरणीय संवेदनशिल निर्बंध रद्द करावेत व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेकापने केली आहे. शेतकरी, ग्रामस्थांवर इको सेन्सेटीव्ह झोन लादू नये, सिन्स्विटी झोनवर येथील बळीराजा शेतकरी यांची हरकत आहे. ते लादू नये. तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी करतानाच, वेळ पडल्यास शेतकर्‍यांसाठी शेतकरी कामगार पक्ष हा नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
 
दरम्यान, १५ जुलै रोजी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे गावांमध्ये तसेच शहरी भागातील घरे, दुकाने, यामध्ये पाणी शिरुन, मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही यावेळी निवेदनाद्वारे रोहा तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली.