२८ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच , कर्जतमध्ये थेट सरपंचपदाचे नव्याने आरक्षण

By Raigad Times    16-Jul-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींकरिता २०२५ ते २०३० या कालावधीसाठी थेट सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. ५५ पैकी २८ ग्रामपंचायती या महिला वर्गासाठी राखीव असून पोशीर आणि अंजप या ग्रामपंचायतींचे प्रश्न नवीन आरक्षणानंतरही कायम आहेत.
 
कर्जत तालुक्यातील थेट सरपंचपदाचे २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे आरक्षण १५ मे २०२५ रोजी काढण्यात आले होते. ते सर्व आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने रद्द करून पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. मंगळवारी (१५ जुलै) कर्जत येथील प्रशासकीय भवनमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
 
यावेळी प्राधिकृत अधिकारी म्हणून डॉ.धनंजय जाधव यांच्यासह निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, कर्जतचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, निवडणूक नायब तहसीलदार कोटुंबे आदी उपस्थित होते. यावेळी सहा वर्षीय ओवी रामदास लोभी या विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली. तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती ‘अनुसूचित जाती’साठी राखीव असून त्यातील एक ग्रामपंचायत महिलेसाठी राखीव करण्यात आली आहे.
 
तर अनुसूचित जमातीसाठी १६ ग्रामपंचायती राखीव ठेवण्यात आल्या असून त्यातील आठ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव आहेत. तर नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी १५ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या असून त्यातील सात ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव म्हणून आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारणमध्ये २२ ग्रामपंचायती असून त्यातील १२ महिला राखीव आणि अन्य सर्वसाधारण असणार आहेत.
ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण खालीलप्रमाणे अनुसूचित जाती ः अनुसूचित जाती सर्वसाधारण
(१) ः मांडवणे आणि अनुसूचित जाती महिला (१) ः कोंडीवडे. अनुसूचित जमाती १६ पैकी अनुसूचित जमाती सर्वसाधारण (८) ः बोरिवली, वारे, साळोख तर्फे वरेडी, पोशीर, रजपे, शेलू, खांडपे, पाषाणे, अनुसूचित जमाती महिला (८) ः भालिवडी, कशेळे, अंजप, बीड बुद्रुक,कळंब, शिरसे, आसल, वैजनाथ
नागरिकांचा मागास प्रवर्ग १६ पैकी नागरिकांचा
मागास प्रवर्ग सर्वसाधारण (८) ः अंभेरपाडा, मोगरज, ओलमन, खांडस, भिवपुरी, जामरंग, पिंपळोली, नेरळ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (७) ः नांदगाव, पळसदरी, वरई तर्फे नीड, हुमगाव, पाथरज, जिते, पाली खलाटी.
सर्वसाधारण २२ पैकी १० खुला तिवरे,
ममदापूर, दहिवली तर्फे वरेडी, पोटल, वदप, गौरकामत,चिंचवली, नसरापूर, वेणगाव, उकरूळ, सर्वसाधारण महिला १२ ः उमरोली, कोल्हारे, किरवली, सावेळे, माणगाव तर्फे वरेडी, सावळे, वाकस, हालिवली, वावलोली, मानिवली, दामत, कडाव.