खालापूर | ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर , ४५ पैकी २२ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच

By Raigad Times    16-Jul-2025
Total Views |
 KHALAPUR
 
खालापूर | खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी हरकती घेतल्यावर पुन्हा मंगळवारी (१५ जुलै) तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी ४५ पैकी २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले असून, या २२ ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे.
 
या आरक्षण सोडतीत साजगांव, माडप, वावोशी आदी ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलले आहे. खालापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील दोन वर्षांत झाल्या असून उर्वरित ५ ग्रामपंचायतींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे थेट सरपंचपदाचे आरक्षण सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आहे. ग्रुप ग्रामपंचायत साजगांव येथे अनुसूचित जाती तर तुपगाव हे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षण पडले आहे.
 
अनुसूचित जमातीसाठी माडप, वावोशी, बोरगाव खुर्द, वावर्ले, जांबरुंग तर महिला अनुसूचित जमातीसाठी कलोते, नारंगी, वरोसे, उंबरे, दुरशेत या ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. तर चावणी, टेंभरी, तांबटी, होनाड, चांभार्ली, शिरवली या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला सरपंच बसणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी गोरठण बुद्रुक, ठाणेन्हावे, इसांबे, नंदनपाडा, जांभिवली, देवन्हावे, टेंभरी, तांबाटी या ग्रामपंचायतींचे सरपंचपद राखीव झाले आहे.
 
सर्वसाधारण महिलांसाठी बिडखुर्द, वडगांव आसरे, नावंढे, वावंढळ, माणकिवली, हाळ खुर्द, सावरोली, वडवळ, लोधीवली या ग्रामपंचायती तर खानाव, खरीवली, आपटी, नडोदे, चौक, होराळे, आत्करगांव, चिलठण, मांजगाव, वासंबे, कुंभिवली या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. ही आरक्षण सोडत तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली.
 
दरम्यान, मागच्या आरक्षण सोडतीत अनेकांचा हिरमोड झाल्याव हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा आरक्षण सोडती काढण्यात आल्या. यादरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. आता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने, इच्छुक उमेदवार आपापल्या ग्रामपंचायतीत कामाला लागणार आहेत.