दक्षिण रायगडात मुसळधार पाऊस , अंबा, सावित्री, कुंडलिका नदीने धोकापातळी ओलांडली!

महाड येथे एकाचा नदीत पडून मृत्यू, तीन घरांचे नुकसान

By Raigad Times    16-Jul-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यात विशेषतः दक्षिण रायगडला मंगळवारी (१५ जुलै) मुसळधार पावसाने अशरशः झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे महाड तालुक्यात सावित्री नदी, रोहा येथील कुंडलिका आणि नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे महाड, रोहा आणि नागोठणे परिसर जलमय झाला होता.
 
महाड शहरातदेखील पुराचे पाणी शिरले होते. पोलादपूर, म्हसळा, भिसेखिंड येथे छोट्या छोट्या दरडी कोसळल्याने रस्त्यावर माती आली होती. अलिबाग रामराज, म्हसळा ढोरजे, तळा पडवण, महाड मल्लिकार्जु मंदिर पुलावरुन पाणी वाहू लागल्यामुळे पुलावरुन होणारी वाहतूक रोखण्यात आली.
 
alibag
 
कोलाड, नागोठणेजवळ मुंबई- गोवा महामार्गावरदेखील पाणी वाहत होते. दोन घरांचे अशंतः आणि एका पक्क्या घराचे नुकसान झाले आहे. महाड शिंगरकोड येथील सुरेश गणपत भोसले यांचा नदीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील प्रामुख तीन नद्या धोका पातळीपर्यंत पोहचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. सायंकाळपर्यंत पावसाने थोडी उघडीप घेतली. त्यामुळे सावित्री आणि अंबादीचे पाणी ओरसले होते.
alibag  
किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद
महाड | पावसाळ्यातील अतिवृष्टीमध्ये किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर दरड येऊन दुर्घटना घडण्याच्या शक्यता लक्षात घेऊन १५ ऑगस्टपर्यंत किल्ले रायगडवर जाण्या- येण्याचा पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढले आहेत. यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी यांच्या २० जूनच्या अहवालानुसार आगामी पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, याकरिता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी ऋग्वेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी, अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती.
 
alibag
 
या अहवालानुसार पायरी मार्गावर दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह वाढल्यास पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून पायरी मार्गावरील किल्ले रायगडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा असा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला असून तो ताबडतोब अंमलात येणार आहे.
 
जुलै महिन्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिक व पर्यटकांना या मार्गाने जाण्यास प्रतिबंध करावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी नाणे दरवाजा, चित्तदरवाजा तसेच किल्ले रायगड येथे पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे सूचित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्ती विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, ५४, ५६ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे लेखी आदेशात नमूद करण्यात आले आहे.