महाड | गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यासह महाबळेश्वर विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचे पाणी महाड शहराच्या सखल भागात शिरले होते. पाणी शिरल्यामुळे शहरातील नागरिक काहीकाळ धास्तावले होते.
महाड तालुक्यात गेल्या २४ तासांत ५८ मिमी तर महाबळेश्वर खोर्यात १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपासून रायगड व विन्हेरे भागात तुफानी पाऊस सुरु आहे. महाड तालुक्यातील काळ व सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सकाळी ११ वाजता शहरातील सुकट गल्ली आणि दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.
महाड म्हाप्रळ मार्गावर रावढळ पुलावरून नागेश्वरी नदीचे पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विन्हेरे भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी नदीचे पात्र तुडुंब भरले असून मल्लीकार्जुन मंदिरासमोरील पुलावरून पाणी जाऊ लागले आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तर दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.