रोहा | रोहा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मंगळवारी (१५ जुलै) सकाळपासून डोंगर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने रोहा बाजारपेठेसह ग्रामीण भागातील तळाघर, निवी, भुवनेश्वर, चणेरा, खुटल, उडदवणे, मालसई, कोलाड इत्यादी भागाततील लोकवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महादेवखार मुख्य रस्त्यावर व भिसे खिंडीत दरड कोसळ्याने नियोजित मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच अष्टमी कोळीवाडा व नाका भागात पाणी शिरल्याने सार्याची धावपळ उडाली होती. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील हजारो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. सोमवारपासून रोहे तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
मंगळवारी सकाळी ढगफुटीप्रमाणे पाऊस पडल्याने सार्यांची तारांबळ उडाली. पावसाने रौद्र रूप धारण केल्यानंतर सार्यांची दाणादाण उडाली असून रोहे शहरातील कुंडलिका व नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. कुंडलिका पुलावर आणि अष्टमी नाक्यावर पुराचे कंबरभर पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रोहे शहरासह नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, धाटाव, चणेरा, भालगाव, घोसाळे तालुक्यातील अन्य भागाला पावसाने पार झोडपून काढले आहे. रोहे, कोलाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक व्यापारी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. डोंगर माथ्यावर पाण्याचा लोंढा खाली असल्याने तळाघर, निवी, भुवनेश्वर, वरसे, रोहा बाजारपेठेत व लोकवस्तीत पाणी शिरल्याने कित्येक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महादेवखार येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळली तर नागोठणे भिसे खिंडीतदेखील चार, पाच ठिकाणी दरड व रस्त्यालगत असलेले वृक्ष कोसळ्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव ठोकून रस्त्यावर आलेला मलबा, मोठमोठे दगड दूर करुन २ तासानंतर वाहतूक खुली करण्यात आली. कोलाड भागातील मुंबई-गोवा महामार्गावर पाणी साचल्याने महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीची दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका नदीच्या जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने दोन्ही बाजूकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलाजवळ पोलीस कर्मचारी थैनात करण्यात आले आहेत. नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून रोहा नगरपालिकेने सायरन वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अष्टमी पुलावरून वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र तरी देखील काही वाहन चालक पाण्यातून मार्ग काढत असल्याचे चित्र अष्टमी नाक्यावर दिसत आहे. ग्रामीण भागातील हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांनी आपल्या नशिबाला दोष दिले आहेत.