नागोठणे | मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवारी धोकापातळी ओलांडली होती. त्यामुळे पुराचे पाणी एसटी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठेसह सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. यावर्षी अंबा नदीला दुसर्यांदा पूर आल्याने नागोठणेकर नागरिक, व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार यांची चांगलीच दाणादाण उडाली.
अतिवृष्टीमुळे नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवारी (१५ जुलै) सकाळी धोक्याची पातळी ओलांडली. यानंतर नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यू समोरील परिसरात पुराचे पाणी शिरले. यावेळी नागोठणे बस स्थानकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तसेच मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने तोही वाहतुकीसाठी बंद झाला होता.
नागोठणे ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया संजय महाडीक व ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना, छोटे-मोठे दुकानदार यांना सुरक्षित राहण्यासाठी सूचना केल्या. नागोठणे येथील अंबा नदीला यावर्षी जून पाठोपाठ जुलैमध्ये असा दुसर्यांदा पूर आला. त्यामुळे नागोठणेकर नागरिक, दुकानदार तसेच व्यापार्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. मिनीडोर रिक्षा स्टँडच्या परिसरात पुराचे पाणी आल्याने याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.