जिल्ह्याला पालकमंत्री हवाच! खा.सुनील तटकरे यांचे महत्वपूर्ण वक्तव्य

पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय होईल; तटकरेंना विश्वास

By Raigad Times    15-Jul-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा, जिल्ह्याचे प्रश्न, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. रायगडला पालकमंत्री नसल्यामुळे स्वाभाविकपणे त्यामध्ये आज गॅप पडलाय, हे काही नाकारायचे कारण नाही. लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, अशी अपेक्षा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
 
अलिबाग येथे सोमवारी (१४ जुलै) पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार तटकरे यांनी केले होते. यावेळी पत्रकारांनी, रायगडला पालकमंत्री नसल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले. तसेच आपणदेखील पालकमंत्रीपद भूषवले आहे, पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचे काय नुकसान होते आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना खा. तटकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. पालकमंत्रीपद हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. अशावेळी मी यावर काहीही बोलणे योग्य नाही. मात्र पालकमंत्री हे पालकमंत्री आहेत.
 
मीदेखील १५ वर्षे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे. जिल्ह्याच्या नियोजन मंडळासह अनेक कमिट्यांवर पालकमंत्री अध्यक्ष असतो. त्यामुळे याबाबतच निर्णय लवकर होईल, असे त्यांनी म्हटले आहे. रायगडला पालकमंत्रीपद नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होऊ शकलेली नाही, जिल्ह्याच्या विकासावर याचा परिणाम होत आहे. याबाबतही पत्रकारांनी छेडले असता, खा. तटकरे यांनी, याबाबतचा निर्णय शासनपातळीवर झाला असल्याचे सांगितले.
 
एक कमिटी तयार करण्यात आली असून आठ दिवसांत निधी वितरण तसेच विविध विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी खा. तटकरे यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, ग्रामसडक योजना, आरसीएफ गेट खुले करण्याबाबतचा निर्णय, उसर येथील रखडलेले मेडिकल कॉलेज, गेलचे प्रकल्पग्रस्त, रेवस-करंजा पुलाच्या कामातील अडचणी सोडविण्याबाबतचे निर्देश याबाबतची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे अमित नाईक, चारुहास मगर, हर्षल पाटील, ॠषिकांत भगत, तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत, मनोज शिर्के तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

alibag
 
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अलिबाग | तालुक्यातील बेलोशी आणि मानतर्फे झिराड येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. खासदारसुनील तटकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर भोपी, माजी सरपंच कविता पाटील, भाविका गावंड, उज्ज्वला सांदणकर, गीतांजली पारंगे, वर्षा काटले, प्रचिती पाटील, गिरीश पाटील, रामचंद्र पारंगे, संदीप भोईर, प्रशांत काटले, नंदकुमार काटले, सतीश पाडगे, सूनील भोईर, शुभम पाटील, उदय सांदणकर आदींसह मानतर्फे झिराडमधील उपसरपंच राकेश पाटील, दर्शन म्हात्रे, प्रसाद नाईक, बंडू घरत, अंकिता भगत यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.