रेवदंडा /कार्लई | मुरूड तालुक्यातील बारशिव गावाजवळ एका दुचाकीला कार चालकाने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, रेवदंडा पोलिसांनी त्याला रोहा चेक पोस्टजवळ अटक केली.
अक्षय किसनलाल जयस्वाल (वय २७) आणि त्याचा मित्र लालचंद्र रामप्रसाद गौड (वय ३५) हे रविवारी (१३ जुलै) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारात रेवदंडाकडून मुरुडकडे जात होते. त्यांची गाडी बारशिवनजीक साई गेस्टहाऊससमोर आली असताना, मुरुडकडून अलिबागच्या दिशेने जाणार्या मारूती एसक्रॉस या कारचालकाने चुकीच्या बाजूला जाऊन दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्तांना मदत न करता कारचालक पळून गेला होता. रेवदंडा पोलिसांनी रोहा चेकपोस्ट येथून त्याला ताब्यात घेतले. संदीप प्रभाकर म्हात्रे (रा.अलिबाग) असे त्याचे नाव आहे. याबाबत दयाशंकर रामप्रसाद जयस्वाल यांनी तक्रार केली असून, रेवदंडा पोलिसांनी कारचालक संदिप म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशीलकर करत आहेत.