१०२ रूग्णवाहिकेमध्येच महिलेची प्रसुती; नवजात अर्भकाचा मृत्यू

पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची रुग्णांप्रती अनास्था उघड

By Raigad Times    15-Jul-2025
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | ओंबळी धनगरवाडीतील महिलेला १०८ ऐवजी १०२ रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणताना महिलेची रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती होऊन तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची रूग्णांप्रती अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
 
प्राथमिक आरोग्य केंद्र पळचिल अंतर्गत ओंबळी धनगरवाडी गौळवाडीतील महिला चंद्रा महादेव बर्गे या महिलेच्या पाचव्या बाळंतपणासाठी सोमवारी सकाळी प्रसवपिडा सुरू झाल्याने तिला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यासाठी १०८ रूग्णवाहिकेचे बुकींग करण्यात आले. मात्र, पुणे येथून या गाडीचे बुकींग होईपर्यंत अर्ध्या तासाहून अधिककाळ जाण्याची शक्यता लक्षात घेत ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध १०२ रूग्णवाहिका पाठविण्यात आली.
 
यावेळी आशासेविका व सहायक यांनी या महिलेला ओंबळी धनगरवाडीतील घरातून रूग्णवाहिकेने ग्रामीण रूग्णालयाकडे नेले जात असताना पैठण गावाजवळ या महिलेची प्रकृती अस्वस्थ झाल्याने आशासेविकेने परिचारिका महिलेला रूग्णवाहिकेसोबत राहण्यास सांगितले. मात्र, परिचारिकेने कोतवाल खुर्द येथे पल्स पोलिओ देण्यासाठी जाण्याचे कारण पुढे करीत प्रसवपिडा होणार्‍या महिलेकडे दूर्लक्ष केले आणि ती कोतवाल खुर्दला निघून गेली. यानंतर काही वेळाने चंद्रा बर्गे या महिलेची १०२ रूग्णवाहिकेतच प्रसुती होऊन काही कालावधीतच नवजात अर्भकाचा मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर ही बाब पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे यांच्या कानावर घातल्यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये १०२ रूग्णवाहिकेतून माता आणि मृत बालक यांना आणण्यात आले. यावेळी चंद्रा बर्गे ही महिला सुरूवातीपासूनच हायरिस्क पेशंट असल्याने तिची विशेष देखभाल करण्याची आवश्यकता असताना ऐन प्रसुतीवेळी महिला परिचारिकेने रूग्णवाहिकेत सोबत राहणे टाळले आणि त्यामुळे नवजात बाळाच्या जिवावर बेतले अशी बाब संबंधित आशासेविका आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे यांच्याशी चर्चे दरम्यान ओंबळी ग्रामस्थांना जाणवली.
 
यामुळे ही बाब ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बावडेकर यांना सविस्तर वृत्तांत सांगितला. यावेळी डिलिव्हरी पेशंटबाबत जिल्हास्तरावर आढावा घेतला जात असल्याने यासंदर्भातील ढिसाळ कारभाराची नक्कीच दखल घेतली जाईल, अशी माहिती डॉ.बावडेकर यांनी दिल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात पुन्हा कोणत्याही माता व बालकाबाबत अशी दूर्दैवी अक्षम्य हेळसांड होऊ नये, अशी अपेक्षा माजी पंचायत समिती सभापती दिलीप भागवत, कोतवाल बुद्रुकचे माजी सरपंच महेश दरेकर, साईनाथ शिंदे, नगरसेवक स्वप्नील भुवड आणि दीपक सकपाळ तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, यासंदर्भात कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.