रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी झाले एक दिवसासाठी शेतकरी!

By Raigad Times    14-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | कधी काळी रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असे. काळ बदलला, शेतकर्‍यांच्या जमिनींवर कारखाने उभे राहत गेले. एमआयडीसी, उद्योग उभे राहत गेले आणि आपल्या मर्जीचा मालक असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत होत गेल्या.
 
तरुण पिढीला शेतीपेक्षा नोकरीचे आकर्षण वाटू लागले. शेती परवडत नाही ही सबब होतीच, सोबत निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांना शेतीपासून दुर लोटत गेला...आजही मोठ्याप्रमाणात शेती होते. पण तिला पूर्वीची सर नाही. खाण्यापुरते पिकविण्यावर भर असतो. अशा वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपला एक दिवस शेतीसाठी देऊ केला.
 
त्यांनी आपल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा फौजफाटा शेतामधील चिखलात उतरवून भात रोपांची लागवड केली...शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने हा एक प्रयत्न केला आहे. अलिबाग तालुक्यातील भाल येथील शेतकरी कृष्णा दळवी यांच्या शेतावर भातलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, जिल्हा कृषी अधिकारी निकिता सुर्यवंशी, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्यासह अलिबाग व मुरुड पंचायत समितीमधील अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले.