नागोठणे | रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरे चोरणार्या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस मांडलेला असतानाच नागोठणे पोलिसांनी १२ जुलै रोजी सकाळी एका आयशर टेम्पोवर कारवाई करीत जनावरांची वाहतूक करणार्या एकाला ताब्यात घेतले. या टेम्पोतून १२ म्हैशी व ६ रेडे अशा १८ जनावरांची सुटका करण्यात आली.
आयशर टेम्पोसह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकत्रित किंमत १५ लाख रुपये असून टेम्पोचालक मोसिन आसमहमंद कुरेशी, (वय २५, रा. लोटस मोहल्ला, शिवाजी नगर, गोवंडी मुंबई) याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरेचोरांविरोधात नागोठणे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. याप्रकरणी मुया जनावरांचा जीव वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे नागोठण्यातील गोरक्षक चेतन कामथे, सौरभ जांबेकर व मनिष पवार यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार, १२ जुलै रोजी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरून महाड ते मुंबई, जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो येणार असल्याची माहिती गोरक्षक गुप्त बातमीदारांकडून नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांना समजली. त्यांनी तातडीने आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कॉ. महेश लांगी व महेश रुईकर यांच्यासह मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळील आय टी आय कॉलेजसमोर शनिवारी सकाळी ६.३० वाजता नाकाबंदी केली.
त्याचवेळी गुप्त बातमीदारार्फत माहिती मिळालेला लाल रंगाचा व एम. एच. ०३ डी व्हि ८०२१ या क्रमांकाचा टेम्पो दिसताच या टेम्पोला थांबविण्यात आले. या टेम्पोच्या मागील बाजूस असलेली ताडपत्री वर करून पहिले असता त्यामध्ये ८ ते १० वर्षे वयोगटाच्या ७ म्हैस व ५ रेडे प्रत्येकी २० हजार रुपये (एकत्रित किंमत रुपये २ लाख ४० हजार) किंमतीच्या तसेच सुमारे दीड ते दोन वर्षे वयाच्या ५ म्हैसी व एक रेडा जातीची सहा वासरे प्रत्येकी किंमत रुपये १० हजार (एकत्रित किंमत रुपये ६० हजार) अशी एकूण ३ लाख रुपये किंमतीची जनावरे टेम्पोत चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने टेम्पोत भरल्याने या सर्व म्हैसी व वासरांना टेम्पो लागून खरचटल्याचे व जखमा झाल्याचे दिसून आले.
नागोठणे पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील म्हशींना नागोठणे पोलिस ठाण्याचे आवारात सुरक्षितपणे मुक्त वातावरणात खाली उतरवून त्यांची तपासणी पशुधन विकास अधिकारी प्रतीक पवालकर यांच्याकडून करण्यात आली. अशाप्रकारे टेम्पोची मागील बाजू ताडपत्रीने झाकून बेकादेशीरपणे म्हैस व रेडे या जनावरांची त्यांना चार पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, दाटीवाटीने निर्दयीपणे वाहतूक करून, त्यांना टेम्पो घासून खरचटण्यास व जखमा होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक मोसिन आसमहमंद कुरेशी याच्या विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनयम १९६० चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, गुरेमालक आपली गुरे मोकाट सोडत असल्यानेच गुरे चोराचे फावत आहे. त्यामुळेच गुरे चोरांच्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या असल्याने गुरे मालकांनी आपल्या गुरांची काळजी घेतानाच आपली गुरे मोकाट सोडू नयेत असे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आले आहे.