बोरघाटात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू , चालत्या ट्रकमधील लोखंडी पाईप पडले कार, दुचाकीवर!

लहान मुलासह तीनजण गंभीर जखमी

By Raigad Times    14-Jul-2025
Total Views |
KHOPOLI
 
खोपोली | मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अंडा पॉईंडजवळ चालत्या ट्रकमधून लोखंडी पाईप पाठीमागून येणार्‍या कार आणि दुचाकीवर पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलासह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
 
शनिवारी (१२ जुलै) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई पुणे जुन्या मार्गावरुन भले मोठे लोखंडी पाईप घेऊन ट्रक हा खोपोलीकडून लोणावळाकडे निघाला होता. बोरघाटातील अंडा पॉईंडजवळ ट्रकचे ब्रेक लागल्याने त्यातील सगळे पाईप ट्रकमधून बाहेर पडत कार आणि दुचाकीवर कोसळले आणि भीषण दुर्घटना घडली. या अपघातात ऋतुजा चव्हाण (वय २६वर्षे), अंकिता शिंदे (वय २८वर्षे) ह्या दोघीचा मृत्यू झाला.
 
तर दुचाकी चालक आणि कारमधील वैभव गलांडे(वय २९वर्षे), सोनाली खंडात्रे (वय ३३वर्षे), शिवराज खडत (वय ०६वर्षे), ललिता शिंदे (वय ५०वर्षे), ललित शिंदे (वय ३०वर्षे), हे जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, मृत्युंजय देवदूत टीम, घाटातील म्यॅकनिक आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. अपघाताचा पुढील तपास खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.