माणगाव | शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत अॅड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशांचे आमिष दाखवून खा. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचे विधान केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया अॅड. राजीव साबळे यांनी दिली आहे.
तसेच आपण २ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी कोणत्या पक्षाचे काम करावे, हा माझा वैयक्तिक विषय आहे. मी सर्वांना आवाहन केले आहे, ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे, ते येतील. २ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याचे अॅड.साबळे यांनी सांगितले. अॅड. राजीव साबळे पुढे म्हणाले की, शिवसेनेचे प्रवक्तेपद हे फक्त नावापुरते माझ्याकडे होते.
ते अनेक वेळा मी नाकारले व सोडण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात कोणताही मानत्या पदाला दिला जात नव्हता. मंत्र्याची भेट घेण्यासाठी वेळ देखील मिळत नव्हता. खा. सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या उद्घाटनवेळी ५ कोटी सीएसआर निधी उपलब्ध करून देतो, अशी घोषणा केली होती. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही नाराज नाही. परंतु, त्यांची भेट होऊन दिली जात नाही. अनेक कामे प्रलंबित आहेत. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी किती शिक्षण संस्था चालवल्या आहेत? असा सवाल करतानाच त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.