उरण | उरण तालुक्यातील मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या काळजाला चिरणार्या घटनेला महिना उलटून गेला आहे. अपघाताच्या दुसर्याच दिवशी मोठ्या थाटात विविध मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र शनिवारी, १२ जुलैला या घटनेला एक महिना उलटूनही त्या मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही.
मैथिलीच्या वृद्ध वडिलांना नाईलाजाने मजुरी करावी लागत आहे तर आई व आजी यांचे डोळे सरकारकडे आशेने लागले आहेत. शासनाच्या निष्क्रीयतेमुळे हे कुटुंब अक्षरशः उपासमारीच्या उंबरठ्यावर आले आहे. प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे सांत्वनाचे फोटो आणि टीव्हीवरील वल्गना यापलिकडे काहीच राहिलेले नाही. प्रत्यक्षात मदतीच्या घोषणा म्हणजे एक ढोंगी स्वप्न ठरले आहे, आणि लोकशाहीची संवेदनशीलता पुरती गढूळ झाली आहे.