अलिबाग | मुरुड चेकपोस्टवर तपासणी करताना पोलिसांना एका तरुणाकडे ७७६ ग्राम चरस सापडले होते. यावरुन रायगड पोलिसांनी अंमली पदार्थाचे रॅकेट चालविणार्या सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत. नेपाळ आणि उत्तरप्रदेशमधून हे रॅकेट सुरु होते. याप्रकरणात २ किलो ६५९ गॅ्रम चरस जप्त केले असून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
२९ जून रोजी रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास मुरुड पोलिसांकडून शिघ्रे चेकपोस्टवर तपासणी सुरु होती. यावेळी अलवान दफेदार (रा. सिध्दी मोहल्ला, मुरुड) याच्या दुचाकी मागे बसलेला राजू खोपटकर (रा. गावदेवी पाखाडी, मुरुड) हा पळून गेला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता, ७७६ ग्रॅम चरस आढळून आले. मुरुड पोलिसांनी हा तपास तसाच पुढे नेला.
तपासात विशाल जैस्वाल सुत्रधार असल्याचे आढळला, तो नेपाळ आणि उत्तरप्रदेश येथून चरस आणून अनुप जैस्वाल आणि अनूज जैस्वाल या दोन साथीदारांकरवी विक्री करत असे. मुरुडजवळील काशिद येथे राहणारा आशिष डिगे आणि सर्वे येथे राहणारा प्रणित शिगवण यांच्यासह अन्य काही जणांच्या माध्यमातून विक्री केलेला १३ लाख ६१ हजार किमतीचे २ किलो ६५९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
याप्रकरणी अलवान जनसार दफेदार, विशाल जैसवाल (उत्तरप्रदेश), अनुप जैसवाल, अजून जैसवाल, आषिश डिगे, प्रणित शिगवण, अनिस कबले, वेदांत पाटील, साहिल नाडकर, अनिल पाटील, सुनील शेलार, राजू खोपटकर, खुबी भगेल आदी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, विजय देशमुख, जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, किशोर बठारे, अतुल बारवे या पथकने ही कारवाई केली.