मुंबई | रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवटणे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि वस्तीगृह अधिक्षीकेला निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य राजकुमार बडोले, धर्मरावबाबा आत्राम, नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. राज्यात ‘कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी व सर्वे क्षण केले जाते. याच सर्वेक्षणादरम्यान वरवणे येथील आश्रमशाळेतील खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीच्या डाव्या डोळ्याखाली चट्टा आढळून आला. वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर कुष्ठरोग विरोधी बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले होते.
दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदन अहवालानुसार टिशू अॅस्ट्रोपॅथोलॉजिकल तपासणी व रक्तनमुने केमिकल विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या स्तरावर देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांना अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देखील देण्यात आले आहे, असेही सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.