आदिवासींच्या बाधित घरांचे सर्व्हेक्षण करून अहवाल सादर करा , आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश

By Raigad Times    10-Jul-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | करंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने तोडक कारवाई केली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी नुकताच राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन आदिवासींची कैफियत मांडली. या वेळी मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिडको हद्दीत आदिवासींची किती बाधित घरे आहेत याचा सर्वेक्षण करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
 
सिडकोच्या जागेवर असलेल्या फणसवाडीत आदिवासींची ३२ घरे होती. महात्मा फुले कॉलेजकडे किंवा विमानतळाच्या पुनर्वसनाच्या वसाहतीकडे जाणारा जो मार्ग आहे त्यावरचा क्रॉसिंग रोड बंद करून रेल्वेला बनवलेल्या डटमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या रस्त्यातील १२ घरे पुनर्वसनाचे कुठलेही ओशासन न देता सिडकोकडून एप्रिल महिन्यात निष्कासित करण्यात आली.
 
या पोर्शभूमीवर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, कर्णा शेलार, आदिवासी संघटनेचे श्री. लांडगे, गणेश कातकरी, गुरू पवार, संतोष पवार, सिडकोचे श्री. ढगे आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री डॉ. उईके यांनी सिडकोचा एक अधिकारी नेमून आदिवार्सीच्या बाधित घरांची स्थळपाहणी करा आणि त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देश दिले.
 
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पनवेल-उरण विधानसभा क्षेत्रामधील सिडको हद्दीत जेवढ्या आदिवासी वाड्या आहेत त्यात सुमारे सातशे ते आठशे जास्तीत जास्त एक हजार कुटुंब असतील, त्यांना प्रत्येकी एक हजार स्केअर फूटचा एकगुंठा प्लॉट उपलब्ध करून दिल्यास त्यांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन होईल, अशी मागणी मंत्री डॉ. उईके यांच्याकडे केली. मंत्रीमहोदयांनी आदिवासींसाठी अशाच प्रकारे चांगली वसाहत निर्माण करू, असे ओशासित केले.