अवजड वाहनांसह खासगी बसचालकांचा बेमुदत संप , जेएनपीटी येथील ३८ हजार कंटेनर वाहतूक चालकांचाही सहभाग

By Raigad Times    01-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | आज मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या बस यांच्या चालक-मालकांचा बेमुदत संप सुरु होणार आहे. यात मुंबईच्या ३० हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे. जेएनपीटी येथील ३८ हजार कंटेनर वाहतूक चालकांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच इतरदेखील खासगी बसचालक, मालक हे या संपात सहभागी होणार आहे.
  
एलपीजी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक, पाणीवाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणार्‍या चालक आणि मालक यांचा मंगळवारी मध्यरात्री (२ जुलै) पासून बेमुदत संप होणार आहे. ई चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचा दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणार्‍या संघटनांचा संप होणार आहे.
 
भारताची सर्वांत मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, अशा जवळपास सगळ्याच संघटनांचा पाठिंबा आहे.
संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता
या संपाचा सर्वांत मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता आहे. कारण मुलांच्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे आषाढी वारीदेखील जवळ आली आहे. त्यामुळे वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. अशा काळातच अवजड वाहनांसह खासगी बसचालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
 
त्यामुळे वारकरी आणि विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात मंत्रालयात काही दिवस आधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही, अखेर ‘चक्का जाम’ आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.