स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सर्व अधिकार स्थानिक पदाधिकार्‍यांकडे

काँगे्रसची भूमिका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडून स्पष्ट

By Raigad Times    01-Jul-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | आघाडीतील तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांना देण्यात येतील, अशी माहिती काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली. ते अलिबाग येथे बोलत होते.
 
राज्यात आज युत्या आघाड्यांची अपरिहार्यता आहे; पण या युती आणि आघाडीची किमंत काँग्रेस पक्षाचा चुकवावी लागली आहे. क्षमता असूनही पक्षाला निवडणुका स्वबळावर लढवता आल्या नाहीत. पक्षाला योग्य पद्धतीने संधी मिळू शकली नाही, हे वास्तव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात यात गुणात्मक बदल कसे करता येतील यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचे काम पक्षाने सुरू केली आहे.
 
महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही लढलो. आजदेखील आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी कटिबद्ध आहोत; पण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा आणि तालुका कमिट्यांकडे असणार आहेत.
 
याची पूर्वकल्पना आम्ही मित्रपक्षांना दिली आहे. या निवडणुकांची तयारी करण्यासाठी आम्ही निरीक्षक नेमले आहे. जिल्हा आणि तालुका कमिट्या जो निर्णय घेतील त्यांना बळ देण्याचे काम प्रदेश पातळीवरून केले जाईल, असे हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटले आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, निरीक्षक श्रीरंग बर्गे, योगेश मगर उपस्थित होते.