ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाखांचे अनुदान मिळणार , राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकर्‍यांचा खर्च ७० टक्के कमी होणार

By Raigad Times    01-Jul-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राज्यात इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रीक ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.
 
त्यामुळे शेतकर्‍यांना शेती परवडेनाशी झाली आहे. वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. पण तुलनेने उत्पन्न मात्र तेवढे मिळत नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांना इलेक्ट्रीक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान दीड लाख रुपये इतके आहे. डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकर्‍यांना शेतीची मशागत महागात पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना इलेक्ट्रीक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे.
 
त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे. इलेक्ट्रीक ट्रॅक्टरने शेतीमध्ये नवीन क्रांती होईल. शेतकर्‍यांनी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केले तर त्यांना राज्य सरकार दीड लाख रूपयांची सबसिडीदेखील देणार आहे. यासोबतच राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल.
 
डिझेलऐवजी इलेक्ट्रीक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात नांगरणीसाठी १५०० ते २००० रूपये प्रति एकर खर्च येतो; पण इलेक्ट्रीक ट्रॅक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.