मुंबई | एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणार्या पूर्ण तिकीटधारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.
या योजनेची सुरुवात आज, १ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणार्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.
आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणार्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणार्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत आज, १ जुलैपासून लागू होत आहे. तथापि, जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमानी प्रवाशांनादेखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकीटाचा लाभ घेता येऊ शकतो. मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या एसटीच्या प्रतिष्ठित ई- शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.