पवारांच्या राष्ट्रवादीकडून भरत गोगावलेंचा हॅप्पी बर्थ डे

By Raigad Times    05-Jun-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यावरून परस्परांविरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. सध्या ‘नॅपकीन वॉर’ जिल्ह्यात सुरू आहे. अशातच एकेकाळी खा.सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणार्‍या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी सोमवारी मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रित करून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील विस्तव काही जात नाही. हा वाद विकोपाला गेला असून महाडमध्ये मंत्री महोदयांची कोंडी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी थेट स्नेहल माणिकराव जगताप यांना पक्षात आणले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकीनची नक्कल करत त्यांच्यावर तोफ डागली. त्याला प्रत्युत्तर देणार नाही तर ते गोगावले, थोरवे व दळवी कसले.
 
रोजगार हमी मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तिघांनीही तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पोटावरून ओठावर आणला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मंत्री भरत गोगावले हे सोमवारी पनवेल या ठिकाणी आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी त्यांना थेट कळंबोली येथील आपल्या शामल मोहन पाटील एज्युकेशन संकुलात निमंत्रित केले. एके काळी खासदार सुनील तटकरे यांचे निष्ठावंत आणि कट्टर समर्थक मानले जात असत. मात्र डिसेंबर २०२३ ला पाटील यांनी दोन राष्ट्रवादी झाल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांची साथ सोडत मोठ्या पवारांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.