कर्जत | कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सवंग प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करतात. वास्तवात कर्जत पोलिसांच्या स्टेशन डायरी पाहिल्या की, कर्जतमध्ये वाल्मिक कराडसारखे काम आमदार करीत असल्याची टिका सुधाकर घारे यांनी केली आहे. पोलीस अधिकारी यांनी दबाव टाकल्याच्या नोंदी आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी (३ जून रोजी) सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आ. थोरवे यांच्यावर चांगलीच टिका केली. एका सभेत नॅपकिन हातात उडविला तर यांना पळताभुई थोडी झाली आहे. तटकरे हे देशाचे नेते आहेत. त्यांच्यावर टीका केल्यानंतर प्रसिद्धी मिळते हे महेंद्र थोरवे यांना चांगलेच कळले आहे. त्यामुळे सतत ते तटकरेंवर तोंडसुख घेत असल्याचे घारे यांनी म्हटले आहे.
२०१९ मध्ये भरत गोगावले नव्हते तरी देखील सुनील तटकरे हे खासदार झाले होते, त्यामुळे महाडमध्ये खासदारीच्या निवडणुकीत तटकरे यांना किती मते आणि गोगावले यांनी स्वतः ला किती मते मिळविली, हे पहायला गेले तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे समजून येत आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीचे नियम पाळले नसते तर आज तटकरे यांच्यावर टीका करणारे आमदार थोरवे हे आमदारच झाले नसते, अशी टिपणीही घारे यांनी केली आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड याचे ज्याप्रमाणे चालले होते तसेच कर्जतमध्ये हे करीत आहेत. तालुक्यात कोण वाल्मिक आहे? हे आता समजू येऊ लागले आहे.
त्यांच्या कारनाम्यांनी स्टेशन डायरी भरलेली असल्याचा गंभीर आरोप सुधाकर घारे यांनी केला आहे. आमदार थोरवे पती, पत्नीच्या नावे असलेले ‘पॅरामाऊंट रिसॉर्ट’ हे वन जमिनीवर आहे. तर आमदारांचे भाऊ मनोहर थोरवे यांचे ‘सुंदर रिसॉर्ट’ हे गुरचरण जमिनीवर वसले आहे. इतकेच नव्हे तर आमदारांच्या घरासमोरील तलावावर शासनाचा खर्च झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरडप्रवण क्षेत्र म्हणून तालुक्यातील सांगवी गावासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी २७ कोटी रुपये आम्ही सुनील तटकरे, अदिती तटकरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणला.
मात्र तो निधी मंजूर झाला आणि आमदारांनी तक्रार अर्ज करून तो निधी अन्य गावांकडे वळवावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पावसात दरडग्रस्त सांगवी गावावर दरड कोसळली तर त्यास सर्वस्वी महेंद्र थोरवे आमदार हेच जबाबदार असतील, असे सुधाकर घारे यांनी म्हटले केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, आवेश जुवारी, माजी सभापती धोंडू राणे, मंगल ऐनकर तसेच सुरेखा खेडेकर, पूजा सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते.