महाड | ‘भविष्यात नाटक कंपनी महाड ही कलासंस्था सांस्कृतिक क्षेत्रात कोकण आणि महाराष्ट्राचे महाड तालुक्याचे प्रतिनिधीत्व करेल’, असे उद्गार हास्यजत्रा फेम ओंकार भोजने यांनी काढले. ते महाड येथे नाटक कंपनीच्या उद्घाटननिमित्ताने आले असताना बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जेम्स फाऊंडेशन आणि जीएम प्रोडक्शन अंतर्गत "नाटक कंपनी महाड” या कलासंस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली. शनिवारी, २८ जून रोजी याचा शुभारंभ अभिनय प्रशिक्षण व लघुपट कार्यशाळेच्या आयोजनाने करण्यात आला.
प्रसिद्ध कलाकार ओंकार भोजने यांच्या चिपळूण येथील "नाटक कंपनी चिपळूण” याच संस्थेची "नाटक कंपनी महाड” ही नवीन शाखा असून प्रमुख उद्घाटक म्हणून स्वतः ओंकार भोजने उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे ग्रंथपाल अरुण मोरे, सीईटीपी महाड चेअरमन अशोक तलाठी, रंगसुगंध महाड संस्थापक सुधीर शेठ, आदर्श शिक्षक सुनील पवार, राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, अॅड.संदीप सर्कले, अपूर्वा देसाई, नगरपरिषद कर्मचारी दीपक महाडिक, उद्योजक भाई गोळे, डॉ. कैलास आवटे, योगेश देवघरकर, उद्योजक अमोल सुंभे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर साळवी तर आभार योगेश देवघरकर यांनी मानले.