महायुतीतून राष्ट्रवादी होणार गायब , रायगडात स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नको; शिवसेना आमदारांचे ठरल

By Raigad Times    03-Jun-2025
Total Views |
 mahad
 
महाड | रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील दोन घटक पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. काही झाले तरी चालेल; पण रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुनील तटकरेंसोबत आम्ही बसणार नाही, अशी भूमिका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली आहे.
 
तर सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही, असा गर्भित इशारा आ. थोरवे यांनी दिला आहे.मंत्री भरत गोगावले यांच्या ६२ व्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा रविवारी (१ जून) पार पडला. यावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी मंत्री योगेश कदम, आ. प्रविण दरेकर, आ. थोरवे, आ. दळवी उपस्थित होते. यावेळी बोलताना, भाजप नेते आ. प्रविण दरेकर यांनी नॅपकिनवरुन टिपणी केली.
 
अंगावर आलेल्याला शिंगावर घेण्याचा गुण रायगडच्या मातीत आहे. त्याचे प्रत्यंतर नॅपकीन सभेतून आले. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारी भरतशेठ यांची छबी मंत्री झाल्यानंतरही कायम आहे. कोकणासाठी रोजगार हमी व फलोत्पादन खाते सर्वात महत्वाचे असून या विभागामार्फत ना. गोगावले यांनी कोकणात क्रांती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुनील तटकरे यांना आम्ही निवडून दिले आणि त्यांनी आम्हालाच पाडण्याचे प्रयत्न केले.
 
यापूर्वीदेखील अनेकांना यांनी फसवले आहे. त्यामुळे तटकरेरूपी ब्याद जेव्हा रायगडमधून हद्दपार होईल, त्यावेळेस रायगडच्या जनतेला न्याय मिळेल, अशी भावना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवली. राज्यात महायुती जरुर आहे पण रायगडात महायुती नाही. भाजप शिवसेना अशी युती होईल, असे सांगतानाच राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही असे आ. दळवी यांनी स्पष्ट केले.
 
ना. योगेश कदम यांनी रायगडचे पालकत्व भरतशेठ यांनाच मिळावे, ही केवळ रायगडमधीलच नव्हे तर रत्नागिरीकरांचीही मागणी आहे, असे सांगितले. सुरुवातीस विकास गोगावले यांनी, रायगड लोकसभेला महायुतीचा उमेदवाराला निवडून आणण्याचे काम आम्ही केले. आम्ही पितापुत्रांनी महाड मतदारसंघात सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या; मात्र त्याची जाण ठेवली नाही, असे विकास गोगावले म्हणाले.
 
यावेळी अरुण चाळके, प्रमोद घोसाळकर, चंद्रकांत कळंबे, निलिमा घोसाळकर, सिध्देश पाटेकर, विद्या देसाई यांनी आपल्या भाषणातून तटकरेंचा समाचार घेत ना. गोगावले यांच्या कार्याचे कौतुक केले. रात्री उशिरा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ना. भरत गोगावले यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिष्टचिंतन केले.

mahad
 
आडवा येईल, त्याला आडवे करा-ना. भरत गोगावले
आम्ही स्वतःहून कुणाला पाय लावत नाही, चुकलो तर चार पावले मागे येऊन माफी मागू; मात्र आम्ही चांगले काम करीत असताना जर कोणी आडवे येत असेल तर त्याला आडवे करा, असा आदेश ना. गोगावले यांनी कार्यकर्त्यांना दिला.
 
आपल्या नॅपकिनची मिमिक्री करणार्‍या खा. तटकरेंचा समाचार घेताना आम्ही नॅपकीन कधी खांद्यावर टाकत नाही. आमच्या नॅपकीनमध्ये गोरगरीब जनतेचे आशीर्वाद असून हा आशीर्वाद काखेत हृदयाच्या जवळ ठेवत असतो, असे गोगावले यांनी सांगितले.

mahad
 
सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही; आ.थोरवेंचा गर्भित इशारा
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर आपला संताप व्यक्त केला. सुनील तटकरे हे औरंग्याची औलाद असल्याचा पुर्नरुच्चार करतानाच रुमाल खांद्यावर घेता काय? हाच रुमालाने पुढच्या निवडणुकीत नाय डोक्यावर घ्यायला लावला तर नाव सांगणार नाही, असा इशारा थोरवे यांनी दिला.
 
भरतशेठ यांनी गोरगरीबांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. तुमचे नाव भ्रष्टाचाराने कोरलेले आहे. आज सरकार जरी आमचे असले तरी सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही, असा गर्भित इशाराही आ. थोरवे यांनी दिला आहे.