कर्जत | नेरळ, कर्जतमधील घरफोडी, चोरीच्या घटनांमधील अट्टल चोरटा गौतम माने यास नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल अर्धा किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. नेरळ कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील वडवली येथील घरफोडी प्रकरणी नेरळ पोलिसांनी प्रभारी अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करताना भिवपुरी स्थानकातून लोकल पकडून पसार होणार्या चोराचा मागोवा घेतला.
कर्जत तालुक्यात एप्रिल व जून महिन्यात झालेल्या दोन मोठ्या घरफोड्यांचा छडा लावत पोलिसांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक सोने चोरून पसार झालेल्या गौतम मानेला अटक केली आहे. नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस उपनिरीक्षक संदीप फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
वडवली येथील घरफोडीमध्ये चोरी केलेले सोने तसेच ठाणे जिल्ह्यातील चोरलेले दागिने गौतम माने याने दिवा येथील एका सोनाराला विकले होते. सध्या त्या दिशेने अधिक चौकशी सुरु असून, मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. गौतम माने याच्यावर यापूर्वीही सोनसाखळी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्या इतर गुन्ह्यांचीही चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असून, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आले.
२०१९ मध्ये गौतम मानेकडून ५५ तोळे सोने केले होते हस्तगत
नेरळ तसेच आजुबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये ११ गुन्हे दाखल असलेल्या गौतम माने याच्यावर नेरळ पोलिसांनी २०१९ मध्येदेखील कारवाई केली होती. त्यावेळी ५५ तोळे सोने हस्तगत करण्याची कारवाई झाली होती आणि ११ गुन्हे उघडकीस आले होते, अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि आताचे रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी दिली आहे.