कर्जतमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन? व्हायरल व्हिडिओने माजवली खळबळ

By Raigad Times    26-Jun-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | तालुयात दिसून आलेल्या पट्टेरी वाघाच्या व्हायरल व्हिडिओने परिसरात खळबळ माजवली आहे. भीमाशंकर अभयारण्य परिसराच्या डोंगरपायथ्याजवळ असणार्‍या आंभेरपाडा काठेवाडी गावाच्या परिसरात ह्या वाघाचे दर्शन झाले असून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
 
मात्र कोकण अधिवासात पट्टेरी वाघ सापडत नाही, असे स्पष्ट करतानाच व्हायरल करण्यात आलेल्या परिसरात गस्ती वाढविण्यात येणार असून कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, असे कर्जत वन विभागाचे अधिकारी समीर शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जत तालुयाला चोहोबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर परिसर लाभला असून हिरवे घनदाट जंगलही दिसून येते. एका बाजूला माथेरानचे घनदाट जंगल तर दुसर्‍या बाजूला भीमाशंकर अभयारण्य वसलेले आहे.
 
या जंगल परिसरात अनेक हिंस्त्र प्राणी सापडतात. याआधी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्याचबरोबर आता भीमाशंकर अभयारण्य परिसराला लागून असणार्‍या डोंगर पायथ्याजवळ काहींना पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल करण्यात आला. हा वाघ अंभेरपाडा काठेवाडी गावाच्या परिसरात पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रथमच पट्टेरी वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहेत.
 
गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाघ कधी कुठून समोर येईल, या विचाराने ग्रामस्थांना धडकी भरली आहे. मात्र यावर कर्जत वन विभागाचे पूर्व परिसरातील नव्याने कार्यभार हाती घेणारे अधिकारी समीर शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही. पट्टेरी वाघ हा कोकण परिसरात कधी आढळून आलेला नाही.
 
या अधिवासात तो राहत नाही. मात्र अशाप्रकारे व्हिडिओ व्हायरल करणे थांबवावे. तसेच कोणीही शहानिशा न करता हा व्हायरल व्हिडिओ फॉरवर्ड करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या परिसरात वाघ दिसून आल्याचा अपप्रचार केला जात आहे त्या परिसरात वन विभाग गस्त घालून राहणार असल्याचेदेखील शिंदे म्हणाले.