खोपोली | खोपोली पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले व हरविलेले ४८ मोबाईल रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकांना परत केल्याने मोबाईल मालकांच्या चेहर्यावर वेगळाच आनंद पहायला मिळला. काही चोरीला गेलेले मोबाईल हे परराज्यासह अनेक भागात अॅक्टीव्ह होते.
तर ४८ मोबाईलपैकी काही मोबाईल हे ज्या व्यक्तींना विकले गेले होते, त्यांच्याशी संपर्क साधून परत आणण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही महिन्यांपासून हरविलेले व चोरीला गेलेल्या मोबाईल फोन्सच्या तक्रारी खोपोली पोलीस ठाण्यात दाखल होताच खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमोल राठोड व पथकाने खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरविलेल्या व चोरीला गेलेल्या ४८ मोबाईल फोन्सचा सीआयईआर या मोबाईल ट्रेस अॅप्लिकेशनच्या माध्यमातून शोध सुरु केला.
या मोहिमेमध्ये हरविलेले व चोरीला गेलील मोबाईल फोन्स हे वेळोवेळी ट्रेस करण्यात आले आणि पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील ४८ मोबाईल हे परराज्य आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून परत मिळविण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत ही ८ लाख ९६ हजार रुपये असून बुधवारी २५ जून रोजी खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत ते देण्यात आले.