श्रीवर्धन | म्हाबदे घाटामध्ये कचर्‍याचा ढीग, प्रचंड दुर्गंधी ; वन विभागाकडून चौकशी होण्याची गरज

By Raigad Times    26-Jun-2025
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन दिघी मार्गावर म्हाबदे घाटामध्ये दिघीच्या बाजूकडे जाताना सपाट असलेल्या रस्त्यावर डाव्या बाजूला मोठा दुर्गंधीयुक्त कचर्‍याचा ढीग लावण्यात आलेला आहे. म्हाबदे घाट हा अत्यंत निसर्ग रम्य असा परिसर आहे. याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी, त्याचप्रमाणे प्राणी यांचा नियमित वावर असतो.
 
सदर घाटामधून बिबट्याचादेखील संचार असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. मात्र अशा निसर्गरम्य ठिकाणी कोणीतरी व्यक्तीने दुर्गंधीयुक्त कचरा आणून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. हा संपूर्ण परिसर वन विभागाच्या अखत्यारित येतो.
 
तरी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर कचरा त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने आणून टाकला? याबाबत चौकशी करून सदर व्यक्तीवर योग्य प्रकारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांमधून केली जात आहे.