सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार

By Raigad Times    26-Jun-2025
Total Views |
 delhi
 
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएससीने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
 
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या दहावी बोर्डाची पहिली परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होईल. तर दुसरी परीक्षा ही मे महिन्यात आयोजित केली जाईल. फेब्रुवारीत होणारी पहिली परीक्षा आणि मे महिन्यांत होणारी दुसरी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर केले जातील, अशी माहिती समोर येत आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या बोर्डाच्या परीक्षेला बसणे अनिवार्य असेल.
 
ही परीक्षा दिल्यानंतर मे महिन्यात होणार्‍या परीक्षेत विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. दुसर्‍या परीक्षेत विद्यार्थी आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी भाग घेऊ शकतात. नव्या नियमांनुसार इंटर्नल असेसमेंट वर्षात केवळ एकदाच केले जातील. तसेच दोन्ही परीक्षांमध्ये बसणार्‍या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले आहेत ते गुण फायनल मानले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
 
सीबीएसई दहावी बोर्डाची पहिली परीक्षा ही १७ फेब्रुवारी ते ६ मार्च या काळात आयोजित केली जाऊ शकते. तर दुसरी परीक्षा ही ५ मे ते २० मे या काळात आयोजित केली जाऊ शकते. अर्थात परिस्थितीनुसार कदाचित वेळापत्रकात थोडाफार बदलही होऊ शकतो.पहिली आणि दुसर्‍या या दोन्ही परीक्षेतील सिलॅबस सारखंच असेल. या अभ्यासक्रामत पूर्ण पाठ्यक्रम सहभागी असेल. त्याचसोबत जे विद्यार्थी दोन्ही परीक्षा देतील त्यांचे परीक्षा केंद्रदेखील एकच असेल.
 
दोन्ही परीक्षांच्या परीक्षा शुल्काबाबत सांगायचे झाल्यास रजिस्ट्रेशनच्या वेळी दोन्ही परीक्षांचे पैसे जमा केले जातील. या परीक्षांबाबत आणखी महत्त्वाचे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या परीक्षेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त विषयांच्या परीक्षेत सहभागी झाला नाही तर त्याला दुसर्‍या परीक्षेत बसण्याची संधी दिली जाणार नाही.