अलिबाग | अलिबागमधील वरसोलीत लॉजिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अलिबाग पोलिसांनी भांडाफोड केला आहे. हा व्यवसाय चालविणार्या महिलेसह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
मंगळवारी (२४ जून) पहाटे पावणेचार वाजता छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्योत्स्ना झंटू दास (वय ५०, सध्या रा. कमलकुंज बिल्डींगसमोर, ममतानगर, ता.अलिबाग, मूळ रा. राजालाठपारा, ता.कॅनिंग दक्षिण २४, परगणा, राज्य-पश्चिम बंगाल) आणि राजेश रामलखन चौपाल (वय-२५ वर्षे, रा. दरभंगा, रा.बिहार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
या दोघांनी हॉटेल लोटस लॉजिंग हे भाडेतत्त्वावर चालवायला घेतले होते आणि याठिकाणी ते कुंटणखाना चालवित होते. वरसोली येथील हॉटेल लोटस लॉजिंगवर देहविक्रीचा अनैतिक व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना सोमवारी (२३ जून) सायंकाळी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. याकरिता बनावट ग्राहक तयार करुन, त्याला लोटसवर लॉजिंगवर पाठविण्यात आले आणि या वेश्या व्यवसायाचा भांडाफोड झाला. बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशार्यानंतर पोलिसांनी
मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता याठिकाणी छापा मारला आणि पीडित तरुणीची सुटका करत, वेश्या व्यवसाय चालविणार्या राजेश चौपाल आणि ज्योत्स्ना दास या दोघांना बेड्या ठोकल्या. या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३, ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचेही मोबाईल, त्यांच्याकडील रोख रकमेसह २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पीडित २७ वर्षीय तरुणी ही मूळची पश्चिम बंगाल राज्यातील असून, ती सध्या अलिबागमध्ये रहायला होती. या तरुणीची सुटका केल्यानंतर, तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करत आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात, पोलीस हवालदार जयेंद्र पाटील, परेश म्हात्रे, महिला पोलीस हवालदार मयुरी जाधव, पोलीस शिपाई शुभम नांदगावकर, अनिकेत पाटील, अनिकेत ढिवरे, सुनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सहा महिन्यांतील दुसरी कारवाई... याआधी १७ डिसेंबर २०२४ रोजी ‘ओयो’च्या नावाखाली हॉटेल शानमध्ये सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा रायगड स्थानिक गुन्हे शाखेने भांडाफोड केला होता. याप्रकरणी चेंढरे येथील दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत चेंढरे येथे ‘ओयो’ लॉजिंगच्या नावाखाली शान हॉटेलमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून कारवाई करण्यात आली होती.