महायुतीत राष्ट्रवादी नको, शिवसेनेची भूमिका ; रायगडात आगामी निवडणूका फक्त युतीमध्ये लढणार

By Raigad Times    21-Jun-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये नाही तर भाजपसोबत युती करुन लढविण्याची भूमिका शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रमुख पदाधिकार्‍यांनी मांडली. काही झाले तरी राष्ट्रवादी काँगे्रसला सोबत घ्यायचे नाही, असेही यावेळी ठरविण्यात आले आहे. ही भूमिका आता पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
 
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाक्युध्द सुरु आहे. सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीनेही या तीन आमदारांना ‘थ्री इडियट’ म्हणून हिणवले आहे. त्यातच रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याबाबतचे बुवाबाजीचे व्हिडीओ व्हायरल करुन राष्ट्रवादीने आणखीनच रोष ओढवून घेतला आहे. गुरुवारी (१९ जून) शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक कर्जत येथे पार पडली.
 
आमागी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जिल्ह्यात भगवा फडकाविण्याचा निर्धार या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. मात्र या निवडणूका शिवसेना आणि भाजप अशा युतीमध्ये लढविल्या जाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊ नये, अशी भूमिका या पदाधिकार्‍यांनी मांडली. शिवसेनेची हिच भूमिका कायम राहिली तर आगामी काळात रायगडात होणार्‍या निवडणुकांमध्ये राज्यात असलेली महायुती जिल्ह्यात मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी नको असली तरी भाजपचेही मत यामध्ये महत्वाचे आहे.
 
भाजप कोणासोबत निवडणुका लढवणार आहे हेदेखील पाहण्यासारखे असणार आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे आमचे पालकमंत्रीपद थांबले नाही तर एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला ब्रेक लागला असल्याचे गोगावले यांचे म्हणणे आहे. आम्हीदेखील चांगले काम केले असेल तर आम्हाला पालकमंत्रीपद मिळेल, असा विश्वासही मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.

alibag
 
राष्ट्रवादीच्या किल्ल्यात शिवसेना करणार धमाका?
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना धमाका करण्याचा तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. दोन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि एक सभापतीपद भूषविलेला नेता यांच्यासह एक मोठा गट शिवसेनेच्या वाटेवर आहे.
 
राष्ट्रवादीच्या या नेत्यांची शिवसेना नेत्यांशी नुकतीच गुप्त बैठक झाली असून त्यांचा लवकरच प्रवेश होणार आहे. श्रीवर्धन म्हणजे राष्ट्रवादीचे बलस्थान आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील पक्षांतर म्हणजे राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते.