पालीतील ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू मोजतेय अखेरची घटका,रस्त्याच्या बाजूकडील भिंत ढासळली,दुर्घटनेचा धोक

By Raigad Times    02-Jun-2025
Total Views |
 pali
 
पाली/ वाघोशी | येथील रामआळीजवळ ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या या वास्तूची पूर्णपणे वाताहत झाली आहे. पावसामुळे या वास्तूच्या रस्त्याच्या बाजूकडील भिंत ढासळली आहे. छत कोसळले आहे. तसेच येथील सर्व भिंती व छत कमकुवत झाले आहे. काही ठिकाणच्या दगड व विटा निखळलेदेखील आहेत.
 
परिणामी या मार्गावरून प्रवास करणे आता धोकादायक झाले आहे. या ब्रिटीशकालीन वास्तूमध्ये पूर्वी पोलीस स्थानक, तहसिल व उपलेखा कार्यालय आणि न्यायालय होते. काही वर्षांपासून ही सर्व कार्यालये बंद करून दुसरीकडे हलविण्यात आली आहेत. सद्यस्थितीत या वास्तूचे अक्षरशः खंडरमध्ये रूपांतर झाले आहे. या वास्तूची अशी दुरावस्था झालेली पाहून नागरिकांकडून चिंता व दुःख व्यक्त केले जात आहे. येथे छतावर झाडदेखील कोलमडून पडले आहे. दारे खिडया तुटल्या आहेत. येथील तुटलेल्या खोल्या आता मुतार्‍या झाल्या आहेत.
 
तिथे अवैध धंदे देखील सुरू असतात. अशाच प्रकारे ही जीर्ण वास्तू जर ढासळत राहिली तर ती नामशेष होईल तसेच दुर्घटनादेखील घडू शकते. भोर संस्थानाचे संस्थानिक पंतसचिव यांच्याकडे या कार्यालयाची कारभार पाहण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी दिली होती, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते जवळपास २००२ ते २००३ पर्यंत येथे कोर्ट आणि पोलिस स्थानक सुरू होते. त्यावेळी या वास्तूची योग्य देखभाल आणि देखरेख होत होती. त्यांनतर मात्र येथे कोणतेच सरकारी कार्यालय राहिले नसल्याने ही ब्रिटीशकालीन ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित झाली.
ही वास्तू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे नगरपंचायत मार्फत येथे कोणतीही दुरुस्ती किंवा काम करता येत नाही. मात्र त्यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यांनी सांगितले की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करा. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यास या वास्तूची दुरुस्ती किंवा ती घातक भिंत हटविण्यात येईल. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती फलक लावण्यात आले आहेत. वाहने व नागरिकांनी येथून जाताना खबरदारी घ्यावी. -प्रणाली शेळके, नगराध्यक्षा, पाली